Ad will apear here
Next
इतिहासाचे विकृतीकरण थांबवण्यासाठी विवेक जागा करायला हवा
राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे आवाहन
रत्नागिरी : ‘इतिहासाचे विकृतीकरण थांबविण्यासाठी समाजाचा विवेक जागा करणे हे सजग लोकांचे आजच्या काळात महत्त्वाचे काम आहे. अभ्यासकांनी योग्य पद्धतीने इतिहासाचा सच्चेपणा शोधला पाहिजे आणि खरा इतिहास लोकांपुढे आणला पाहिजे,’ असे आवाहन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी ‘बाइट्स ऑफ इंडिया’शी साधलेल्या विशेष संवादावेळी केले. 

पाच दिवसांच्या कीर्तनसंध्या उपक्रमासाठी नुकतेच ते रत्नागिरीत आले होते. त्या वेळी ‘बाइट्स ऑफ इंडिया’तर्फे त्यांची मुलाखत घेण्यात आली. कीर्तनसंध्या उपक्रमात त्यांनी भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास सांगितला. इतिहास, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे, क्रांतिकारक, राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या घटना, संतांचे कार्य आणि वाङ्मय आदी आफळेबुवांच्या अभ्यासाचे विषय असून, त्या विषयावर ते प्रभावीपणे कीर्तन करतात. त्यांच्या कीर्तनांना होत असलेल्या मोठ्या गर्दीवरून त्यांच्या अभ्यासाची आणि विषय उलगडून सांगण्याच्या हातोटीची कल्पना येते. इतिहासाचे विकृतीकरण आणि त्यामुळे समाजात उफाळून येत असलेले वाद या सद्यस्थितीच्या अनुषंगाने, ‘खरा इतिहास ओळखायचा कसा,’ असा प्रश्न त्यांना विचारला असता, त्यांनी इतिहासाच्या अभ्यासासंदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. 

ते म्हणाले, ‘दुर्दैवाने काही वेळा काही सिद्धांत मनात धरूनच इतिहास सांगितला जातो आणि त्यामुळे त्या अनुषंगानेच त्याकडे पाहिले जाते. तसे होऊ नये, म्हणूनच अभ्यासकांनी वेळ काढून इतिहासाचा अभ्यास करायला हवा. इतिहासाचा सच्चेपणा शोधण्याचे काही टप्पे असतात. त्यात पहिला टप्पा पत्रलेखन आणि शिलालेखांचा, तर दुसरा टप्पा बखरींचा असतो. बखरीमध्ये एखादा सिद्धांत लक्षात आला आणि त्या काळातील एखाद्या पत्रात त्याच्या विरोधातील विचार असेल, तर मानसिकता ओळखण्यासाठी न्यायालय पत्र प्राधान्याने विचारात घेते.’

पत्राला त्या वेळचा ताजा संदर्भ असतो, तर बखर म्हणजे नंतरच्या काळात लोकांनी आठवून आठवून लिहिलेल्या गोष्टी असतात. अर्थात, तरीही बखर बऱ्यापैकी समकालीन असते. त्यामुळे संदर्भासाठी पत्रांनंतर दुसरा टप्पा बखरींचा असतो.

‘इतिहासाचा सच्चेपणा शोधण्यातील तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या घटनेच्या अलीकडे आणि नंतर झालेल्या घटना यांचा विचार करून, विवेकाने संबंधित घटनेचा विचार करावा लागतो,’ असेही आफळे यांनी आवर्जून सांगितले. ते म्हणाले, ‘इतिहासाचा वापर करून कोणताही गैरसमज किंवा जातीयवाद पसरवला जाणे दुर्दैवी आहे. म्हणूनच एखाद्या घटनेच्या आगेमागे नेमके काय घडले होते, याचा साकल्याने विचार करावा लागतो. उदाहरणच सांगायचे झाले, तर अफझलखान भेटीवेळी त्याचा वकील कृष्णाजी भास्कर पुढे आला आणि त्याला छत्रपती शिवरायांनी ठार केले, एवढाच इतिहास सांगणे पुरेसे आहे; पण कृष्णाजी भास्कर ब्राह्मण होता, असे सांगून त्याला जातीय रंग देण्याची आवश्यकता नाही. शिवरायांचा वकीलही ब्राह्मणच होता. एवढेच काय, त्यांच्या अष्टप्रधान मंडळातील सात जण ब्राह्मण होते. कोणाची जात पाहून नव्हे, तर स्वराज्याच्या आणि सामान्य प्रजेच्या हितरक्षणाच्या आड जो कोणी येईल, त्या प्रत्येकाला शिवरायांनी सजा केली होती. शिवरायांच्या चरित्रातील या सगळ्या गोष्टी पाहिल्या, की आपोआपच खरे काय ते लक्षात येते. म्हणूनच अशा पद्धतीने साकल्याने विचार करणे आवश्यक असते.’ 

इतिहासाचे विकृतीकरण थांबविण्यासाठी आणि तरुणांच्या मनांवर चांगले संस्कार होण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील विवेक जागा करण्याची गरज आहे, असेही आफळे म्हणाले. ‘काही विद्यार्थी, काही माणसे बिघडलेलीच असतात. आपण वाईटचे करायचे, असे त्यांनी ठरवलेलेच असते. त्यांना समजावण्यात काही अर्थ नसतो. काही जण आंधळे भक्त असतात, ते दुर्दैवाने अंधभक्ती करतात. त्यामुळेही गैरसमज पसरतात; मात्र या दोन्हींच्या मधील जे विद्यार्थी असतात, त्यांन नेमका कोणता मार्ग घ्यावा ते कळत नाही. त्या वेळी त्यांना दोन्ही बाजू सांगाव्यात आणि विवेकाने त्यांनाच निर्णय घेऊ द्यावा. त्यांचा विवेक जागृत केला, तर ते स्वतःच योग्य तो निर्णय घेऊ शकतील आणि विकृत इतिहासाच्या जोखडापासून समाज नक्की मुक्त होऊ शकेल,’ असा विश्वास आफळे यांनी व्यक्त केला. 

राष्ट्रवादाची भावना सतत जागृत ठेवण्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे, असे विचारले असता, ते म्हणाले, ‘राष्ट्राची श्रद्धास्थाने, सांस्कृतिक प्रतीके या गोष्टींना राष्ट्रवीरांनी किती प्रामाणिकपणे जपले आहे, हे लक्षात घेऊन आपणही ते जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राष्ट्रवीरांचे जन्मोत्सव, पराक्रमाचे दिन साजरे करायला हवेत. आपल्या चालीरीती, सण साजरे करण्यापासून राष्ट्रीय सणांमध्ये उपस्थिती लावण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींचा यात समावेश आहे.’

‘आपल्या संतांची, सणांची योग्य माहिती पालकांनी शिक्षकांनी मुलांपर्यंत, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला हवी. पुराणकथांमधील भाकडता काढून, त्यांमधील सामाजिक संदेश, राष्ट्रीय संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे. तरच आपल्या संस्कृतीचे महत्त्व त्यांच्या लक्षात येईल,’ असे आफळे म्हणाले. त्यासाठी त्यांनी काही उदाहरणेही दिली. ‘श्रीकृष्णाने गोवर्धनपूजा केली, ती निसर्गपूजा नव्हे काय? कृष्णाने कालियामर्दन केल्याची कथा आहे. तो कालिया यमुनेचा डोह प्रदूषित करत होता. म्हणून प्रदूषण थांबविण्यासाठी कृष्णाने त्याला धडा दिला, हा पर्यावरणाचा संदेश नाही आहे का? शिवाय, कृष्णाने त्याला ठार केले नाही, शिक्षा करून सोडून दिले. हे सर्पमैत्रीचे उदाहरण नव्हे का? श्रीकृष्णाने असहाय द्रौपदीला वस्त्रे पुरविली, ती सामाजिक कथा नव्हे का? त्यामुळे कृष्णाची कथा द्वापार युगापुरती मर्यादित राहत नाही. कौरव-पांडवांमध्ये वैमनस्य असले, तरी दुर्योधन चित्रसेनाकडून पकडला गेला, तेव्हा युधिष्ठिराने घेतलेली ‘बाहेरच्यांसाठी आम्ही एकशे पाच’ ही भूमिका, महाभारताची शिकवणूक कलियुगातही महत्त्वाची आहे,’ असे प्रतिपादन त्यांनी केले.

‘संतांनी कधीही चमत्कार केले नाहीत किंवा त्यावर विश्वास ठेवला नाही. पाश्चात्यांचे अंधानुकरण करण्यापेक्षा संतांचा संदेश लक्षात घ्यायला हवा आणि तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला हवा,’ असे आवाहन आफळे यांनी केले. 

(चारुदत्त आफळे यांनी साधलेल्या संवादाचा व्हिडिओ सोबत देत आहोत. कीर्तनसंध्या उपक्रमातील कीर्तनांचा सविस्तर वृत्तांत वाचण्यासाठी येथे क्लिक करा, तर व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZTDBW
Similar Posts
‘... तर काश्मीर प्रश्न निर्माणच झाला नसता’ रत्नागिरी : ‘तत्कालीन काश्मीर संस्थानाने मागितलेल्या लष्करी मदतीच्या निमित्ताने पाकिस्तानचा पराभव करण्याची चांगली संधी भारताकडे चालून आली होती; मात्र विजय टप्प्यात आलेला असताना अचानक पुढे न जाण्याचा निर्णय तेव्हाच्या नेतृत्वाने घेतला. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न निर्माण झाला आणि तो आजही कायम
देशाच्या इतिहासातील पहिला सर्जिकल स्ट्राइक शास्त्रीजींनी केला रत्नागिरी : ‘स्वतंत्र भारताच्या इतिहासातील पहिला सर्जिकल स्ट्राइक दुसरे पंतप्रधान लालबहादूरशास्त्री यांनी केला. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून पाकिस्तानची लष्करी ठाणी ताब्यात घेण्याचे कार्य त्यांच्या आदेशामुळे १९६५ साली साध्य झाले,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्तबुवा आफळे यांनी रत्नागिरीत केले
राष्ट्रउभारणीसाठी वक्तृत्व आणि कर्तृत्वातून नेतृत्व घडवायला हवे रत्नागिरी : ‘समाजातील चांगल्या गोष्टींच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी आणि त्या बाजूने बोलण्यासाठी धाडस आणि चांगल्या वक्तृत्वाची आवश्यकता असते. त्यातून कर्तृत्व घडत जाते आणि त्यातूनच टप्प्याटप्प्याने नेतृत्व घडते, जे राष्ट्रउभारणीसाठी अत्यंत आवश्यक असते. या कार्यामध्ये सध्या प्राध्यापकांचा सहभाग फारसा दिसत नाही
देशभक्तीचा अंगार फुलविणारा कीर्तन महोत्सव - रत्नागिरीतील ‘कीर्तनसंध्या’ कीर्तनाला साधारण किती गर्दी होऊ शकते? काही अंदाज? ५०-१००-२००... रत्नागिरीतील पाच दिवसांच्या कीर्तनसंध्या महोत्सवात राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवांची कीर्तने ऐकण्यासाठी दर दिवशी सुमारे पाच हजार जणांची उपस्थिती असते! ‘कीर्तन हे देव-धर्मापुरते मर्यादित असते,’ यासह अनेक समजुती या महोत्सवाने खोट्या ठरविल्या आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language